२३ जानेवारी २०१२

सुवर्णपदकाचा चकवा ![हा लेख "लोकमत"साठी लिहिला होता.............]
रंच सोन्याची दरवाढ सुवर्णपदकाच्या मुळावर आली असेल का? एका दृष्टीने हे मान्य करता येईल की अलीकडे प्रतितोळा 29 ते 30 हजार रुपयांर्पयत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे; पण मग पदक हे तोळा-दोन तोळ्याचे दिले जातेय का. नक्कीच नाही. चांदी किंवा अन्य धातूच्या पदकाला सर्वसाधारणपणो ग्रॅमभर सोन्याचा मुलामा देऊन तयार केले जाते त्यालाच सुवर्णपदक म्हणायचे. त्याची किंमत किंवा त्यात किती सोने आहे, यावर सुवर्णपदकाचे महत्त्व ठरत नाही, तर इतरांपेक्षा अव्वल ठरणा-याची शान आणि प्रतिष्ठेचे ते एक  मोजमाप मानले जाते. 
‘पदक म्हणे सोन्याला, 
कुंकू तुझं लावून पस्तावलो फार, 
नेहमीच्याच तुङया भाववाढीने,  
डोनर्सनी पाठ फिरवली यार’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गुणवंतांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आणि नाराजी आहे. विद्यापीठ प्रशासनाने जवळपास 70 गुणवंतांना सुवर्णपदक जाहीर केल्यानंतरही ते त्यांना ऐनवेळी दिले नाही. कारण काय तर म्हणो सोन्याची भाववाढ झाली असून, सुवर्णपदकांच्या प्रायोजकांनी त्यांची ठेव 1 लाख रुपयांर्पयत वाढविली नाही. दोन वर्षापासून म्हणो प्रशासनाने प्रायोजकांकडे ठेव वाढविण्याबाबत तगादा लावला. शेवटी त्यांनी जुमानले नाही म्हणून प्रायोजित केलेली त्यांची सुवर्णपदके तयार केली नाहीत. विद्यापीठाची ही भूमिका हास्यास्पदच नव्हे तर अगदी लज्जस्पद आहे, असेच म्हणावे लागेल. 
विद्यापीठ म्हणजे केवळ डिग्री देणारी शैक्षणिक संस्था नव्हे तर ते विद्याथ्र्याना सुसंस्कृत, विद्वान व एक आदर्श नागरिक बनविण्याचे सर्वोच्च केंद्र मानले जाते. त्या ठिकाणी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध शैक्षणिक व समाजाभिमुख संशोधनाच्या योजना राबविणो अपेक्षित आहे; परंतु विद्यापीठाने सुवर्णपदकाबाबत एवढी कंजुषी बाळगावी, हे न सुटणारे कोडे आहे. विद्यापीठ फंडातील काही रक्कम सुवर्णपदकासाठी खर्च केली असती, तर विद्याथ्र्यामध्येही आपल्या पाठीवर शाबासकीची थाप पडल्याची भावना निर्माण झाली असती. एरव्ही काटकसरीचे धोरण जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने खरेच या धोरणाची काटेकोरपणो अंमलबजावणी केली आहे का. जर केली असेल तर कुलगुरूंसाठी तब्बल 23 लाखांची कार विद्यापीठ फंडातून घेतली असती का, हा साधा प्रश्न आहे. 
असो, आता तर विद्यापीठाने पदकांबाबत हाईटच केली आहे. काय तर म्हणे, यापुढे जो प्रायोजक (सुवर्णपदकाचा डोनर) विद्यापीठाच्या खात्यावर 1 लाखांच्या ठेवीचा ताळमेळ घालील, त्यांचे पदक हे ‘गुणवत्ता पदक’ या नावे जाहीर केले जाईल. जे विविध विषयांकरिता पदक देण्यासाठी इच्छुक आहेत, अशा नव्या प्रायोजकांना विद्यापीठात 5 लाखांची ठेव बंधनकारक करण्यात आली आहे. 5 लाखांची ठेव जमा करणा-या अशा प्रायोजकांचे पदक यापुढे ‘सुवर्णपदक’ म्हणून गुणवंतांना प्रदान केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. 
तात्पर्य, विद्यापीठाच्या नव्या निर्णयानुसार गुणवंतांच्या कौतुकाप्रती समता नव्हे तर विषमतेचा पुरस्कार केल्यासारखे होईल. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच क्षेत्रत समता प्रस्थापित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्याच महापुरुषाच्या नावाने चालणा-या विद्यापीठात हा निर्णय किंवा पदकाची नवी प्रथा अंगिकारने कितपत योग्य आहे ....?