राजकारणामध्ये कष्टकरी, गरीब, दलित, पददलित, शोषित, वंचित, उपेक्षित, अल्पसंख्याक, सर्वसामान्य शेतकरी अर्थात प्रचलित राजकीय भाषेत सांगायचेच तर ‘आम आदमी'ला कवडीचेही स्थान राहिलेले नाही. ज्याला राजकारणाची खाज आहे. त्याने मग सत्ता अथवा महत्वाच्या पदावर जाण्याचे स्वप्न न बघता आयुष्यभर मॉडर्न पद्धतीची येस्करकी करावी अन् खुशाल त्यातच समाधान मानावे. सत्ता तर लांबची बात. आम आदमीला पक्ष-संघटनांच्या मुख्य बॉडीमध्ये सामावून न घेता अलिकडे त्यांच्यासाठी खास ‘अल्पसंख्याक सेल', ‘मागासवर्गीय सेल', अमका सेल, तमका सेल अशा दुय्यम आघाड्या उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ज्याचा निर्णय प्रक्रियेशी कवडीचाही संबंध कधी येत नाही. बिचारी लाचार मंडळीही अशाच सेलच्या माध्यमातून दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत......!
असो, महाराष्ट्राच्या राजकारणापुरते बोलायचे झाल्यास आजपर्यंत या राज्यातील सत्ता अवघ्या ४५ घराण्यांभोवतीच फिरते आहे. मंत्रीपदे, संघटनाची मुख्यपदेही याच घराण्यांच्या दावणीला बांधलेली.. अन् वर पुन्हा म्हणायचे ‘आम्हाला घराणेशाही मान्य नाही'... ही बाब एका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांचीच नाही तर शिवसेनेतही तेच चालू आहे. या पक्षांची चर्चा इथे यासाठी की, हे सारे सत्तेच्या परीघात सामावलेले आहेत म्हणून...
परवा युवक काँग्रेसची राज्यभरात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली... नतिजा काय? या निवडणुकीमध्ये राज्यातील एकूण एक जिल्ह्यात पुढा-यांची पोरं निवडून आली. एकिकडे राहुल गांधींच्या आदेशानं युवक काँग्रेसची निवडणूक लोकशाही पद्दतीनं पार पडली खरी पण निकालांवर नजर टाकली तर घराणेशाहीचं प्रस्थ कायमच राहिल्याचं दिसतंय.
२९ जानेवारी रोजी डहाणू येथे झालेल्या जाहीर सभेत अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हे आवाहन करतात की, राजकारणातील घराणेशाही आणि भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आदिवासी आणि दलित तरुणांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे. माझे आजोबा, आजी, वडिल आणि आई राजकारणात राहिले, ही घराणेशाहीच असून मला ती संपवायची आहे. त्यासाठी दलित आणि आदिवासी समाजातून समक्ष नेतृत्वाची मला आवश्यकता आहे. आणि आता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी केले काय तर आपलीच कार्टी निवडणुकीला उभी केली अन निवडूनही आणली...
राहुल गांधींच्या विचारला महाराष्ट्रातील नेत्यांनी हरताळ फासला.त्याचे हे मजेशीर किस्से... युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पतंगराव कदमांचे सुपुत्र विश्वजित कदम हे निवडून आलेत....!
विदर्भात यवतमाळ लोकसभा क्षेत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल तर नागपुरमध्ये दत्ता मेघेंचा मुलगा समीर, अकोला मतदार संघात माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा मुलगा नकुल देशमुख हे निवडून आले. परभणीत आमदार रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी मेघना निवडून आलीय. रेंगे पाटलांचे चिरंजीव बाळासाहेब, नांदेडमध्ये ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा पिंकू, जालन्यात सत्संग मुंडे हा आमदारांचा पुत्र निवडून आलाय. थोडाफार अपवाद सोडला तर राज्य भारत हेच चित्र आपणास पाहायला मिळेल.
राष्ट्रवादीचे काय? ते हि असेच. शरद पवार साहेबांचे हट्टी पुतणे अजितराव उपमुख्यमंत्री. लाडकी कन्या सुप्रिया सुळे खासदार...
भाजपचे....? मुंडे साहेबांचे पुतणे धनंजय, आमदार... लेक पंकजा, आमदार... जावयाला डावलले म्हणून बिचारा गेला आता राष्ट्रवादीत...!
मग शिवसेना तरी मागे का......
“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!” हे उदगार आहेत, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे गेल्या वर्षाच्या शिवतीर्थावरील दशहरा मेळाव्यातले. उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष मी नव्हे त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. ok....
विशेष म्हणजे, त्याच मेळाव्यात दसर्याच्या शुभमुहुर्तावर युवराज आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग करण्यात आले. ज्याला संघर्ष कशाला म्हणतात ते माहिती नाही ... महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव नाही, अभ्यास नाही..आंदोलनाची धग काय ती माहिती नाही. महाराष्ट्राचा शेंडा बुडका माहिती नाही, अशा कोवळ्या पोराला काय तर म्हणे युवा सेनेचे अध्यक्ष. सेनेत ज्यांनी तारुण्य पणाला लावले, त्यांना काय मिळाले....? त्यांनी
असो, आता सरळसरळ युवराजांची झील ओढायची. त्यांचा जय हो.. करायचा.
त्पर्य, हे सारेच पक्ष म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर 'चोर चोर मौ सेरे भाई' ....!
सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी मग ते कोणत्याही पक्षात असोत त्यांनी सतरंज्या उचलण्यासाठी अन साहेबांच्या आगे बढोच्या घोषणा देण्यासाठी आयुष्य घालवावे. आपापल्या जात समूहाचे मतदान यांच्या पारड्यात टाकण्यासाठी रक्त आटवायचे.......... बस्स......!
1 टिप्पणी:
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज घराणेशाही आहे. ग्रामपंचायत असो की लोकसभा, तेथे घराणेशाहीचा वरचष्मा दिसल्याशिवाय राहत नाही. एखादी समिती, बोर्डवर देखील राजकीय नेते त्यांच्या वारसाला पद मिळावे यासाठी झटापट करताना दिसतात. राजकीय पद म्हणजे आज ‘वारसा हक्क’ बनले की काय, हा मनात संभ्रम निर्माण होतो.सर्वसामान्य कार्यकर्ताही संबंधित पदाचा दावेदार आहे, याकडे मात्र कुणीही दुर्लक्ष करू नये. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था किंवा तत्सम मंडळ तसेच, राजकीय समितीवर देखील सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी तमाम सुजाण नागरिकांनी आता घराणेशाहीच्या विरोधात संघटित होणे, ही काळाची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा