०७ नोव्हेंबर २०११

विद्यापीठ गेटने ओलांडली चाळिशी !


                                                           नामांतरापुर्वीचे गेट                                 नामांतरानंतरचे गेट

वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात... वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दुर्लक्षित जीवन.. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे...
असो, मुद्दा असा आहे कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ........हे नाव समोर आले की समोर चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या.... परिवर्तनाच्या लढ्याचे...! एरव्ही विद्यापीठ म्हटले कि ज्ञान दानाची एक सर्वोच्च संस्था, अशी विध्यापिठाची सर्वसाधारण प्रतिमा समोर येते. या विध्यापिठाबद्दल मात्र तसे होत नाही. हे देखील ज्ञानदानाचे सर्वोच्च केंद्र आहे. मात्र अन्य विध्यापिठाच्या तुलनेत या विध्यापिठाची ओळख वेगळी आहे... इतिहास वेगळा आहे. 

आता आपणास प्रश्न पडला असेल कि ठीक आहे पण हे सारे सांगण्याचे आत्ता औचित्य काय ? हा खटाटोप कशासाठी ? तर मित्रहो, आहे औचित्य... काय आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हटले कि समोर येते ती विद्यापीठगेटची प्रतिमा. त्यामुळे जगातील ही एकमेव वास्तू असेल ज्यामुळे संपूर्ण विद्यापीठ तर ओळखले जाते. काल रविवारी ६ नोव्हेंबररोजी या गेटने वयाची चाळीशी ओलांडली आहे.मात्र दुर्दैव हे कि त्याची आठवण ना प्रशासनाला होती, ना समाजाला..! हे विद्यापीठगेट म्हणजे समतेच्या लढ्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हे विद्यापीठगेट म्हणजे सामाजिक परिवर्तन लढय़ाची प्रेरणा.. अर्थात विद्यापीठ नामांतराचे प्रेरणास्रोत म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याशिवाय आंबेडकरी समाजाचे एक श्रद्धास्थान म्हणूनही ती वास्तू ओळखली जाते. नामांतराचा लढा म्हणजे या गेटवरील पाटी बदलण्याचा लढा नव्हता. ती प्रतीकात्मकदृष्ट्या सामाजिक समतेची लढाई होती. यासाठी तब्बल १७ वर्षे संघर्ष करावा लागला. मराठवाडाच नव्हे तर विदर्भ, खान्देशात आंबेडकरी समाजातील अनेकांना शहीद व्हावे लागले. अनेक महिला विधवा झाल्या. अनेक मुले अनाथ झाली. अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली..! 

शेवटी १४ जानेवारी १९९४ रोजी राज्य सरकारने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला अन् या गेटवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' अशी अक्षरे झळकली.. तेव्हापासून हे गेट म्हणजे आंबेडकरी समाजाचे श्रद्धास्थान बनले. दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!

या गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: