१६ डिसेंबर २०११

परिपक्व कार्यकर्ता घडविण्यासाठी बासाहेबांनी काढली होती प्रशिक्षण संस्था


विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजकारण, अर्थकारण, राजकारण, कायदा, शिक्षण आदी समाजाच्या सर्वांगांना स्पर्ष करून देशात एक अनोखा ठसा उमटविला... त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आजही जगातील सर्वोत्कृष्टांमध्ये नंबर वन आहे. असो, बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर लिखाण झाले आहे, पण, संसदीय राजकारणाबाबत बाबासाहेबांनी हाती घेतलेला एक अनोखा उपक्रम दुर्लक्षित राहिला. त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...
बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने या देशाची राज्यघटना लिहिली. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना भारत हे जगात एक लोकशाहीवादी प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून प्रस्थापित करायचे होते. लोकशाहीवर त्यांचे नितांत प्रेम होते. तरी सुद्धा लोकशाहीमुळे देशातील सांसदीय राजकारणात अराजक निर्माण होईल, असे भाकीतही त्यांनी त्याचवेळी वर्तविले होते. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना? स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’ 
आज ६०-६५ काळ लोटला. बाबासाहेबांनी तेव्हा वर्तविलेले भाकीत आज खरे ठरत असल्याचे विविध घटनांवरून दिसून येते. सद्या संसदेला वेठीस धरून अण्णा हजारेने सुरू केलेले आंदोलन घ्या... महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या विविध बैठकांमध्ये सत्तासंपादनासाठी सुरू असलेले रणकंदन घ्या... बेभान झालेल्या लोकप्रतिनिधींकडून सभागृहात होत असलेली खुच्र्यांची फेकाफेकी आणि तोडफोड आपण पाहातोच... विधान सभा असो की लोकसभा-राज्यसभा एकाच मुद्यावर विरोधकांनी चालविलेला गोंधळ... तालिका अध्यक्षांच्या दिशेने पुस्तके भिरकावल्याने सदस्यांचे निलंबन... हे कशाचे द्योतक म्हणायचे. 
अर्थातच प्रश्नांची जाण नसणारे... अभ्यास नसणारे... जनहितापेक्षा स्वहीत जपणारे... प्रभावी वक्तृत्वाची वाणवा असणारे लोकप्रतिनिधी आपण निवडून देत आहोत... त्यामुळे संसदीय संस्थांमधली लोकशाही संपुष्टात येत आहे.....! याची चिंता बाबासाहेबांशिवाय अन्य कोण्या समाजसुधारक किंवा राजकीय तत्ववेत्याला त्यांच्या हयातीत वाटली नसावी, हेही या देशाचे दुर्दैवच म्हणायचे...!
कोणत्याही संसदीय संस्थेत निवडून गेलेला लोकप्रतिनिधी हा कार्यक्षम असला पाहिजे... लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सामथ्र्य आणि विचारशक्ती त्यांच्यात असली पाहिजे... तो सुशिक्षित... प्रशिक्षित... सभागृहामध्ये प्रखर वक्तृत्व करणारा असला पाहिजे... या जाणीवेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जून १९५६ मध्ये संसदीय राजकारणाचे शिक्षण देणारी ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्सङ्क या नावाची संस्था सुरू केली होती. या संस्थेचे बाबासाहेब स्वत: संचालक होते. संस्थेच्या सर्व व्यवस्थापनाची धुरा त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू ग्रंथपाल व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शां.शं. रेगे यांच्यावर सोपविली होती. रेगे यांना संस्थेचे रजिस्ट्रार केले होते. या संस्थेत काय शिकवायचे त्याबाबतचा अभ्यासक्रमही स्वत: बाबासाहेबांनीच तयार केला होता. त्यात प्रचलित राजकारण, भारतीय राज्यघटना, संसदीय कार्यपद्धती, राष्ट्रीय अर्थकारण, अर्थसंकल्प, परराष्ट्रीय धोरण, आणि विशेषत्वाने वक्तृत्व साधना आदी विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. या संस्थेत दरवर्षी केवळ २० विद्याथ्र्यांना प्रवेश देण्याचे त्यांचे धोरण होते. सुरूवातीच्या बॅचला व्ही.बी. कर्णिक, बगाराम तुळपुळे, प्रा. मधु दंडवते, प्रा. देशपांडे, वक्तृत्वासाठी सचिवालयातले कायदा विभागाचे सचिव मधुकर धोत्रे, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सरदेसाई आदींनी नियमितपणे शिकविले. स्वत: बाबासाहेब ‘संसदीय व्यवहार व राजकारण' या विषयावर अध्यापन करण्यासाठी डिसेंबरमध्ये दिल्लीहून मुंबईला येणार होते. त्याबाबत रेगे यांना ४ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब हे स्वत: ट्रंककॉलवरून बोलले होते... परंतु, नियतीला हे मान्य नसावे.... मुंबईला येण्यापूर्वी ६ डिसेंबर रोजी या प्रज्ञासूर्याचे महापरिनिर्वाण झाले...!!! 
दुर्दैव असे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हा अभिनव उपक्रम गुंडाळला गेला. मुंबईचे सिद्धार्थ महाविद्यालय असो की औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालय. या संस्थांनी मोठमोठ्या विद्वान मंडळींना जन्म दिला. या संस्थांमध्ये तयार झालेले अनेक जण आज कोणी न्यायमूर्ती, कोणी विद्यापीठ अनुदान आयोगाचा अध्यक्ष तर कोणी केंद्रीय नियोजन मंडळाचा सदस्य, शास्त्रज्ञ, उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘पीईएस'च्या कार्यकारी मंडळाने बाबासाहेबांनी सुरू केलेली संसदीय राजकारणाचे शिक्षण देणारी ही संस्था जर पुढे चालवली असती, तर संसदीय राजकारणाची अधोगतीचे चित्र कदाचित आजच्यापेक्षा वेगळे दिसले असते. त्याही पेक्षा कदाचित आंबेडकरी चळवळीचे राजकीय पटलावरचे चित्र आज वेगळे दिसले असते...!

- विजय सरवदे 
  औरंगाबाद
  संपर्क 
9850304257 
7588818889 
9403388889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: