३० डिसेंबर २०११

संभाजीराजांचा अंत्यविधी महारांनीच केला !!!

खरा इतिहास दडविण्याची.. खोटा इतिहास लिहिण्याची.. आणि खोट्या इतिहाचा प्रचार आणि त्याला बळकटी देण्याची महान परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहे..

असो, आपल्या देशात महापुरुषांना जातीमध्ये विभागले असून त्याला सारेच जबाबदार आहेत. प्रत्येक महापुरुषांनी सर्व जातीधर्मांच्या कल्याणासाठी खस्ता खालल्या... सर्वांचे मंगल आणि हित साधले... पण, केवळ अमुक महापुरुष आपल्या जातीचा आहे नां.. मग त्याच्यावर आमचीच मालकी... असा पायंडाच पडलेला आहे..

याठिकाणी आज चर्चा करायची ती मराठा तरुणांबद्दल. महाराष्ट्रातील गावखेड्यात मराठा समाजाने आपल्या लहान भावंडाविषयी ( पूर्वाश्रमीचे महार व आत्ताच्या बौद्धांविषयी ) एवढा द्वेष का बाळगलाय? हेच समजत नाही.

इथे हे लिहिण्याचे कारण हे की, मराठ्यांनी कधी महारांना समजून घेतलेच नाही.. अलिकडे मराठा सेवा संघ, संभाजीराजांच्या नावे सुरू झालेले ब्रिगेड संघटनांनी परिवर्तनवादी भूमिका घेतली आहे. व्यासपीठावर ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत. आता फोटोही लावत आहे (फक्त व्यासपीठावर). पण, ही बाब आजही या समाजातल्या तरुणांना खटकत आहे, तुम्ही बाबासाहेबांचे नाव का घेता... फोटो कशाबद्दल लावता, असे खडे बोल ते त्यांच्या पुढारी म्हणा की वक्त्यांना बोलत आहेत. हे खुद्द संभाजी ब्रिगेडचे प्रदीपदादा सोळुंके यांनीच माझ्याशी बोलताना सांगितले. बाबासाहेबांची एवढी अ‍ॅलर्जी का बरं, असे विचारले तर प्रदीपदादा म्हणतात सुरूवात तर झाली नां... हळूहळू होईल सारे सुरळीत..?

असो,
मुद्यावर येऊत.
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठा सैन्य आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्नांची शिकस्त करूनही मराठा सैन्य शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. आप्तस्वकीयांनी दगाबाजी केल्याने संभाजीराजे आणि गुरू कवी कलश या दोघांना औरंगजेबच्या सैन्यांनी जिवंत पकडले....

त्यांना औरंगजेबापुढे तेव्हाचे बहादूरगड आताच्या धर्मवीरगड येथे आणण्यात आले. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम पुणे जिल्ह्यातील तालुका शिरूर येथील ‘‘तुळापूर'' येथे हलवला. तीथे तुळापूरला भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर या महान तेजस्वी राजाच्या शरीराचे अक्षरश: तुकडेतुकडे करून अमानुषपणे त्यांची हत्या केली.... कवी कलशलाही तिथेच हालहाल करून मारले...  आतिशय निर्दयपणे शंभूराजा व   कवी कलश यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करतच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबापुढे आपली माण झुकवली नाही... मरणालाही शतदा लाज वाटेल अशा क्रूर आणि पाशवी पद्धतीने या दोघांचा वध करण्यात आला. तेव्हा तुळापूर आणि लगतच्या वढू गावात भयाण दहशत पसरलेली होती... एकिकडे औरंगजेबचे सैन्य हे संभाजीराजे आणि कवी कलशच्या अंत्यविधीसाठी कोणी बाहेर आले तर त्याचीही खैर नाही, अशा धमक्या देत होते... चिटपाखरू घराबाहेर पडायला तयार नव्हते... तेव्हा वढू गावातील शूरपराक्रमी महारांना धाडस केले... जमीनीवर पडलेल्या आपल्या राजाचे धड व शरिराच्या अस्ताव्यस्त पडलेल्या तुकड्यांची विटंबना होऊ नये म्हणून जीवाची पर्वा न करता त्या गावातील महारांनी राजा छत्रपती शंभूचे सर्व तुकडे जमा करून महारवाड्यालगतच त्या तेवढ्याच सन्मानाने अंत्यविधी केला..!!!  आजही संभाजी राजांची समाधी वढू गावच्या महारवाड्यालागत आहे...

असे असतानाही केवळ शंभूराजा आणि शिवबाच्या नावाचा जयघोष करणारे आमचे मोठे बांधव आजही गावागावातल्या महारांना वेठीस धरून त्यांच्यावर राजरोसपणे अत्याचार करत आहेत... कधी त्यांची घरे जाळून तर कधी दलित तरुणांचे डोळे काढून तर कधी खैरलांजीसारखी घटना घडवून स्वत:ला धन्य समजताहेत. का? कशासाठी?जरा इतिहासाची पानेही चाळा कधी तरी बांधवांनो... आणि मग कळेल, महारांची शौर्यगाथा...!

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

सरोदे साहेब आपल्या दमदार लेखणिने पुन्हा इतिहासात डोकावयाला मिळाले. पण या खèया इतिहासाचे मारेकरी कोण? हे ही आम्हाला कळू द्या