२५ सप्टेंबर २०११

घराणेशाहीचं चांगभलं...!


राजकारणामध्ये कष्टकरी, गरीब, दलित, पददलित, शोषित, वंचित, उपेक्षित, अल्पसंख्याक, सर्वसामान्य शेतकरी अर्थात प्रचलित राजकीय भाषेत सांगायचेच तर ‘आम आदमी'ला कवडीचेही स्थान राहिलेले नाही. ज्याला राजकारणाची खाज आहे. त्याने मग सत्ता अथवा महत्वाच्या पदावर जाण्याचे स्वप्न न बघता आयुष्यभर मॉडर्न पद्धतीची येस्करकी करावी अन् खुशाल त्यातच समाधान मानावे. सत्ता तर लांबची बात. आम आदमीला पक्ष-संघटनांच्या मुख्य बॉडीमध्ये सामावून न घेता अलिकडे त्यांच्यासाठी खास ‘अल्पसंख्याक सेल', ‘मागासवर्गीय सेल', अमका सेल, तमका सेल अशा दुय्यम आघाड्या उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ज्याचा निर्णय प्रक्रियेशी कवडीचाही संबंध कधी येत नाही. बिचारी लाचार मंडळीही अशाच सेलच्या माध्यमातून दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत......!

असो, महाराष्ट्राच्या राजकारणापुरते बोलायचे झाल्यास आजपर्यंत या राज्यातील सत्ता अवघ्या ४५ घराण्यांभोवतीच फिरते आहे. मंत्रीपदे, संघटनाची मुख्यपदेही याच घराण्यांच्या दावणीला बांधलेली.. अन् वर पुन्हा म्हणायचे ‘आम्हाला घराणेशाही मान्य नाही'... ही बाब एका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांचीच नाही तर शिवसेनेतही तेच चालू आहे. या पक्षांची चर्चा इथे यासाठी की, हे सारे सत्तेच्या परीघात सामावलेले आहेत म्हणून...

परवा युवक काँग्रेसची राज्यभरात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली... नतिजा काय? या निवडणुकीमध्ये राज्यातील एकूण एक जिल्ह्यात पुढा-यांची पोरं निवडून आली. एकिकडे राहुल गांधींच्या आदेशानं युवक काँग्रेसची निवडणूक लोकशाही पद्दतीनं पार पडली खरी पण निकालांवर नजर टाकली तर घराणेशाहीचं प्रस्थ कायमच राहिल्याचं दिसतंय.

२९ जानेवारी रोजी डहाणू येथे झालेल्या जाहीर सभेत अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हे आवाहन करतात की, राजकारणातील घराणेशाही आणि भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आदिवासी आणि दलित तरुणांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे. माझे आजोबा, आजी, वडिल आणि आई राजकारणात राहिले, ही घराणेशाहीच असून मला ती संपवायची आहे. त्यासाठी दलित आणि आदिवासी समाजातून समक्ष नेतृत्वाची मला आवश्यकता आहे. आणि आता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी केले काय तर आपलीच कार्टी निवडणुकीला उभी केली अन निवडूनही आणली...

राहुल गांधींच्या विचारला महाराष्ट्रातील नेत्यांनी हरताळ फासला.त्याचे हे मजेशीर किस्से... युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पतंगराव कदमांचे सुपुत्र विश्वजित कदम हे निवडून आलेत....!
विदर्भात यवतमाळ लोकसभा क्षेत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल तर नागपुरमध्ये दत्ता मेघेंचा मुलगा समीर, अकोला मतदार संघात माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा मुलगा नकुल देशमुख हे निवडून आले. परभणीत आमदार रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी मेघना निवडून आलीय. रेंगे पाटलांचे चिरंजीव बाळासाहेब, नांदेडमध्ये ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा पिंकू, जालन्यात सत्संग मुंडे हा आमदारांचा पुत्र निवडून आलाय. थोडाफार अपवाद सोडला तर राज्य भारत हेच चित्र आपणास पाहायला मिळेल.

राष्ट्रवादीचे काय? ते हि असेच. शरद पवार साहेबांचे हट्टी पुतणे अजितराव उपमुख्यमंत्री. लाडकी कन्या सुप्रिया सुळे खासदार...

भाजपचे....? मुंडे साहेबांचे पुतणे धनंजय, आमदार... लेक पंकजा, आमदार... जावयाला डावलले म्हणून बिचारा गेला आता राष्ट्रवादीत...!

मग शिवसेना तरी मागे का......

“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!” हे उदगार आहेत, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे गेल्या वर्षाच्या शिवतीर्थावरील दशहरा मेळाव्यातले. उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष मी नव्हे त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. ok....


विशेष म्हणजे, त्याच मेळाव्यात दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर युवराज आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग करण्यात आले. ज्याला संघर्ष कशाला म्हणतात ते माहिती नाही ... महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव नाही, अभ्यास नाही..आंदोलनाची धग काय ती माहिती नाही. महाराष्ट्राचा शेंडा बुडका माहिती नाही, अशा कोवळ्या पोराला काय तर म्हणे युवा सेनेचे अध्यक्ष. सेनेत ज्यांनी तारुण्य पणाला लावले, त्यांना काय मिळाले....? त्यांनी
असो, आता सरळसरळ युवराजांची झील ओढायची. त्यांचा जय हो.. करायचा.

त्पर्य, हे सारेच पक्ष म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर 'चोर चोर मौ सेरे भाई' ....!

सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी मग ते कोणत्याही पक्षात असोत त्यांनी सतरंज्या उचलण्यासाठी अन साहेबांच्या आगे बढोच्या घोषणा देण्यासाठी आयुष्य घालवावे. आपापल्या जात समूहाचे मतदान यांच्या पारड्यात टाकण्यासाठी रक्त आटवायचे.......... बस्स......!

११ सप्टेंबर २०११

ध्येयापासून तसूभरही विचलीत न होणारे बाबासाहेब.. अन् तेवढेच हळवे



रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर...!!!

रमा..., कशी आहेस तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.

दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.

मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.

रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.

आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.

मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा ! मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.

खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.

माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.

रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.

रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.

सर्वांस कुशल सांग.

कळावे, 
तुझा

भीमराव
लंडन
३० डिसेंबर १९३०

(यशवंत मनोहर यांच्या 'रमाई' या पुस्तकातून साभार)

०४ सप्टेंबर २०११

ढेकुण मारून शहीद होणे...हि मर्दुमकी नव्हे !!!


मागील १०-१५ दिवसापासून दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या '' लीला '' सर्वांनीच पहिल्या.. आपल्यापैकी काहींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचे समर्थनही केले. मिडीयानेही त्या '' लीला '' क्याच नव्हे क्याश केल्या. आण्णा आणि टीम च्या आंदोलनाचा धुराला उडाला. राज्य घटना.. लोकशाही... संसदेला जेवढे वेठीस धरता येईल तेवढे आण्णा आणि व त्यांच्या सवंगड्यांनी धरले.... असो, अंधपणे पाठींबा देणे हा माझा स्वभाव नाही अन ते आमच्या स्वभावाला पटतही नाही. एक पत्रकार म्हणून प्रवाहाच्या विरोधात जाउन सत्यता पडताळून पाहणे कधीही चंगले. सांगण्याचा मुद्दा असा की, लोकपाल... भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचे प्रभावी हत्यार, असा समज आण्णा व त्यांच्या समर्थकांचा आहे. हरकत नाही. भ्रष्टाचाराचा थेट फटका सामान्य माणसालाच बसतो. त्यामुळे भ्रष्टाचारचे समर्थन कोणीही करणार नाही. पण, आणांच्या लोकपाल संकल्पनेत NGO' s,नाहीत. जे योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचा मलिदा लाटतात. लोकपाल च्या कक्षेतून खाजगी एन जी ओ ना वगळण्याचे कारण काय ? कि अण्णा हजारेंपासून केजरीवाल, बेदी, स्वामी अग्निवेश यांच्या एन जी ओ आहेत आणि त्यांना करोडो रुपये अनुदान आणि मदत मिळत असते म्हणून ? लोकपाल कक्षेत सरकारी अधिकारी-कर्मचारी नाहीत...(आता बोंब झाल्यावर आण्णांना हे सुचले) गावच्या ग्रामसेवकापासून ते मंत्रालयातील साचीवान्पार्यंत सामान्य मानसंची अडवणूक होते. प्रश्न काळ्या पैश्याचा ? मध्यंतरी स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेविबद्दल या मंडळींनी बरीच ओरड केली... ते समर्थनीय होते. पण, आण्णा आणि मंडळींनी भारतातील धार्मिक भ्रष्टाचार किंवा तेथे श्रद्धेच्या आडून केल्या जाणाऱ्यागोरख धंद्याबद्दल मात्र चुप्पी का बरे साधली असावी ? अण्णा धार्मिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दलही जरा बोला. भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार धार्मिक क्षेत्रात होतोय. भारतात बाबा, बापू, भैयू, साध्वी, महाराज यांच्याकडे लाखो-करोडो रुपयाची मालमत्ता आहे. पण त्याबद्दल अण्णा किंवा त्यांचे सहकारी अवाक्षरही काढत नाहीत. नुकतेच केरळ मधील पद्मनाभ मंदिरात एक लाख कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. ती संपत्ती निर्विवादपणे राष्ट्राची असताना काही महाभाग मंदिर व्यवस्थापनाचा अधिकार प्रस्थापित करू पाहत आहेत. आज अनेक बाबा लोक अण्णांच्या आंदोलनात अग्रभागी आहेत. त्यांचीही संपत्ती जाहीर झाली पाहिजे. एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आण्णा आणि मंडळींनी त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. प्रती गांधी बनून लोकांच्या भावनेशी जास्त काळ खेळणे अंगलट येऊ शकते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली या देशाची घटना आणि लोकशाही साऱ्या जगात आदर्शवत ठरली आहे. पण, आण्णा व त्यांच्या बगलबच्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य घटनेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली घटना बदलण्याचे आणि घटनेबद्दल अपप्रचार करण्याचे षडयंत्र तर राबवत नाहीत ना अशी शंका यायला लागली आहे. न्या. बी. जी. कोळसे-पाटील म्हणतात, ''देशाचा कारभार हा भारतीय घटने प्रमाणे चालतो. तीच सर्वश्रेष्ट आहे . घटनेनुसार कायदे करायचे अधिकार फक्त पार्लमेंटला व विधानसभेला आहेत. सिविल सोसायटीला कसा कायदा असावा किंवा कायद्यात काय दुरुस्त्या असाव्यात एवढाच सांगण्याचा अधिकार आहे. मी म्हणतो तो कायदा पास करा असे दडपण, उपोषणाच्या माध्यमातून कितीही मोठ्या माणसाला आणता येत नाही. अण्णांनी त्यांचे लोकपाल बिल पार्लमेंटला दिले आहे येथेच आणांचे काम संपले आहे. त्यामुळे अण्णांनी यापुढे सतत उपोषण करून दबाव न आणणे यातच खरे हित आहे. एक ध्यानात घ्या...... ''आण्णा तुम्ही महान आहात... पण घटनेपेक्षा लहान आहात''तूर्तास एवढेच...........