३० डिसेंबर २०११

संभाजीराजांचा अंत्यविधी महारांनीच केला !!!

खरा इतिहास दडविण्याची.. खोटा इतिहास लिहिण्याची.. आणि खोट्या इतिहाचा प्रचार आणि त्याला बळकटी देण्याची महान परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहे..

असो, आपल्या देशात महापुरुषांना जातीमध्ये विभागले असून त्याला सारेच जबाबदार आहेत. प्रत्येक महापुरुषांनी सर्व जातीधर्मांच्या कल्याणासाठी खस्ता खालल्या... सर्वांचे मंगल आणि हित साधले... पण, केवळ अमुक महापुरुष आपल्या जातीचा आहे नां.. मग त्याच्यावर आमचीच मालकी... असा पायंडाच पडलेला आहे..

याठिकाणी आज चर्चा करायची ती मराठा तरुणांबद्दल. महाराष्ट्रातील गावखेड्यात मराठा समाजाने आपल्या लहान भावंडाविषयी ( पूर्वाश्रमीचे महार व आत्ताच्या बौद्धांविषयी ) एवढा द्वेष का बाळगलाय? हेच समजत नाही.

इथे हे लिहिण्याचे कारण हे की, मराठ्यांनी कधी महारांना समजून घेतलेच नाही.. अलिकडे मराठा सेवा संघ, संभाजीराजांच्या नावे सुरू झालेले ब्रिगेड संघटनांनी परिवर्तनवादी भूमिका घेतली आहे. व्यासपीठावर ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत. आता फोटोही लावत आहे (फक्त व्यासपीठावर). पण, ही बाब आजही या समाजातल्या तरुणांना खटकत आहे, तुम्ही बाबासाहेबांचे नाव का घेता... फोटो कशाबद्दल लावता, असे खडे बोल ते त्यांच्या पुढारी म्हणा की वक्त्यांना बोलत आहेत. हे खुद्द संभाजी ब्रिगेडचे प्रदीपदादा सोळुंके यांनीच माझ्याशी बोलताना सांगितले. बाबासाहेबांची एवढी अ‍ॅलर्जी का बरं, असे विचारले तर प्रदीपदादा म्हणतात सुरूवात तर झाली नां... हळूहळू होईल सारे सुरळीत..?

असो,
मुद्यावर येऊत.
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठा सैन्य आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्नांची शिकस्त करूनही मराठा सैन्य शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. आप्तस्वकीयांनी दगाबाजी केल्याने संभाजीराजे आणि गुरू कवी कलश या दोघांना औरंगजेबच्या सैन्यांनी जिवंत पकडले....

त्यांना औरंगजेबापुढे तेव्हाचे बहादूरगड आताच्या धर्मवीरगड येथे आणण्यात आले. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम पुणे जिल्ह्यातील तालुका शिरूर येथील ‘‘तुळापूर'' येथे हलवला. तीथे तुळापूरला भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर या महान तेजस्वी राजाच्या शरीराचे अक्षरश: तुकडेतुकडे करून अमानुषपणे त्यांची हत्या केली.... कवी कलशलाही तिथेच हालहाल करून मारले...  आतिशय निर्दयपणे शंभूराजा व   कवी कलश यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करतच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबापुढे आपली माण झुकवली नाही... मरणालाही शतदा लाज वाटेल अशा क्रूर आणि पाशवी पद्धतीने या दोघांचा वध करण्यात आला. तेव्हा तुळापूर आणि लगतच्या वढू गावात भयाण दहशत पसरलेली होती... एकिकडे औरंगजेबचे सैन्य हे संभाजीराजे आणि कवी कलशच्या अंत्यविधीसाठी कोणी बाहेर आले तर त्याचीही खैर नाही, अशा धमक्या देत होते... चिटपाखरू घराबाहेर पडायला तयार नव्हते... तेव्हा वढू गावातील शूरपराक्रमी महारांना धाडस केले... जमीनीवर पडलेल्या आपल्या राजाचे धड व शरिराच्या अस्ताव्यस्त पडलेल्या तुकड्यांची विटंबना होऊ नये म्हणून जीवाची पर्वा न करता त्या गावातील महारांनी राजा छत्रपती शंभूचे सर्व तुकडे जमा करून महारवाड्यालगतच त्या तेवढ्याच सन्मानाने अंत्यविधी केला..!!!  आजही संभाजी राजांची समाधी वढू गावच्या महारवाड्यालागत आहे...

असे असतानाही केवळ शंभूराजा आणि शिवबाच्या नावाचा जयघोष करणारे आमचे मोठे बांधव आजही गावागावातल्या महारांना वेठीस धरून त्यांच्यावर राजरोसपणे अत्याचार करत आहेत... कधी त्यांची घरे जाळून तर कधी दलित तरुणांचे डोळे काढून तर कधी खैरलांजीसारखी घटना घडवून स्वत:ला धन्य समजताहेत. का? कशासाठी?जरा इतिहासाची पानेही चाळा कधी तरी बांधवांनो... आणि मग कळेल, महारांची शौर्यगाथा...!

१६ डिसेंबर २०११

परिपक्व कार्यकर्ता घडविण्यासाठी बासाहेबांनी काढली होती प्रशिक्षण संस्था


विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजकारण, अर्थकारण, राजकारण, कायदा, शिक्षण आदी समाजाच्या सर्वांगांना स्पर्ष करून देशात एक अनोखा ठसा उमटविला... त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आजही जगातील सर्वोत्कृष्टांमध्ये नंबर वन आहे. असो, बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर लिखाण झाले आहे, पण, संसदीय राजकारणाबाबत बाबासाहेबांनी हाती घेतलेला एक अनोखा उपक्रम दुर्लक्षित राहिला. त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...
बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने या देशाची राज्यघटना लिहिली. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना भारत हे जगात एक लोकशाहीवादी प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून प्रस्थापित करायचे होते. लोकशाहीवर त्यांचे नितांत प्रेम होते. तरी सुद्धा लोकशाहीमुळे देशातील सांसदीय राजकारणात अराजक निर्माण होईल, असे भाकीतही त्यांनी त्याचवेळी वर्तविले होते. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना? स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’ 
आज ६०-६५ काळ लोटला. बाबासाहेबांनी तेव्हा वर्तविलेले भाकीत आज खरे ठरत असल्याचे विविध घटनांवरून दिसून येते. सद्या संसदेला वेठीस धरून अण्णा हजारेने सुरू केलेले आंदोलन घ्या... महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या विविध बैठकांमध्ये सत्तासंपादनासाठी सुरू असलेले रणकंदन घ्या... बेभान झालेल्या लोकप्रतिनिधींकडून सभागृहात होत असलेली खुच्र्यांची फेकाफेकी आणि तोडफोड आपण पाहातोच... विधान सभा असो की लोकसभा-राज्यसभा एकाच मुद्यावर विरोधकांनी चालविलेला गोंधळ... तालिका अध्यक्षांच्या दिशेने पुस्तके भिरकावल्याने सदस्यांचे निलंबन... हे कशाचे द्योतक म्हणायचे. 
अर्थातच प्रश्नांची जाण नसणारे... अभ्यास नसणारे... जनहितापेक्षा स्वहीत जपणारे... प्रभावी वक्तृत्वाची वाणवा असणारे लोकप्रतिनिधी आपण निवडून देत आहोत... त्यामुळे संसदीय संस्थांमधली लोकशाही संपुष्टात येत आहे.....! याची चिंता बाबासाहेबांशिवाय अन्य कोण्या समाजसुधारक किंवा राजकीय तत्ववेत्याला त्यांच्या हयातीत वाटली नसावी, हेही या देशाचे दुर्दैवच म्हणायचे...!
कोणत्याही संसदीय संस्थेत निवडून गेलेला लोकप्रतिनिधी हा कार्यक्षम असला पाहिजे... लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सामथ्र्य आणि विचारशक्ती त्यांच्यात असली पाहिजे... तो सुशिक्षित... प्रशिक्षित... सभागृहामध्ये प्रखर वक्तृत्व करणारा असला पाहिजे... या जाणीवेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जून १९५६ मध्ये संसदीय राजकारणाचे शिक्षण देणारी ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्सङ्क या नावाची संस्था सुरू केली होती. या संस्थेचे बाबासाहेब स्वत: संचालक होते. संस्थेच्या सर्व व्यवस्थापनाची धुरा त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू ग्रंथपाल व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शां.शं. रेगे यांच्यावर सोपविली होती. रेगे यांना संस्थेचे रजिस्ट्रार केले होते. या संस्थेत काय शिकवायचे त्याबाबतचा अभ्यासक्रमही स्वत: बाबासाहेबांनीच तयार केला होता. त्यात प्रचलित राजकारण, भारतीय राज्यघटना, संसदीय कार्यपद्धती, राष्ट्रीय अर्थकारण, अर्थसंकल्प, परराष्ट्रीय धोरण, आणि विशेषत्वाने वक्तृत्व साधना आदी विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. या संस्थेत दरवर्षी केवळ २० विद्याथ्र्यांना प्रवेश देण्याचे त्यांचे धोरण होते. सुरूवातीच्या बॅचला व्ही.बी. कर्णिक, बगाराम तुळपुळे, प्रा. मधु दंडवते, प्रा. देशपांडे, वक्तृत्वासाठी सचिवालयातले कायदा विभागाचे सचिव मधुकर धोत्रे, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सरदेसाई आदींनी नियमितपणे शिकविले. स्वत: बाबासाहेब ‘संसदीय व्यवहार व राजकारण' या विषयावर अध्यापन करण्यासाठी डिसेंबरमध्ये दिल्लीहून मुंबईला येणार होते. त्याबाबत रेगे यांना ४ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब हे स्वत: ट्रंककॉलवरून बोलले होते... परंतु, नियतीला हे मान्य नसावे.... मुंबईला येण्यापूर्वी ६ डिसेंबर रोजी या प्रज्ञासूर्याचे महापरिनिर्वाण झाले...!!! 
दुर्दैव असे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हा अभिनव उपक्रम गुंडाळला गेला. मुंबईचे सिद्धार्थ महाविद्यालय असो की औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालय. या संस्थांनी मोठमोठ्या विद्वान मंडळींना जन्म दिला. या संस्थांमध्ये तयार झालेले अनेक जण आज कोणी न्यायमूर्ती, कोणी विद्यापीठ अनुदान आयोगाचा अध्यक्ष तर कोणी केंद्रीय नियोजन मंडळाचा सदस्य, शास्त्रज्ञ, उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘पीईएस'च्या कार्यकारी मंडळाने बाबासाहेबांनी सुरू केलेली संसदीय राजकारणाचे शिक्षण देणारी ही संस्था जर पुढे चालवली असती, तर संसदीय राजकारणाची अधोगतीचे चित्र कदाचित आजच्यापेक्षा वेगळे दिसले असते. त्याही पेक्षा कदाचित आंबेडकरी चळवळीचे राजकीय पटलावरचे चित्र आज वेगळे दिसले असते...!

- विजय सरवदे 
  औरंगाबाद
  संपर्क 
9850304257 
7588818889 
9403388889

१४ डिसेंबर २०११

अस्पृश्त्तेची दाहकता आजही तेवढीच !!!


माझ्या या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या ""रिपब्लिकन पक्षाची वाताहत: दोषी कोण ?"" या लेखावर अनेक मित्रांनी कमेंट दिल्या. कोणी प्रत्यक्ष ब्लॉग वाचून तर कोणी फेसबूक वरची नोट वाचून. त्याबद्दल सर्वांचे आभार..धन्यवाद..!!
तर मित्रांनो.. कमेंट बाजूनेच आल्या तर बरे वाटावे अन विरोधी आल्या तर वाईट, या मताचा मी मुळीच नाही. मला वाटते संपूर्ण मजकूर वाचूनच दिली तर त्या प्रतिक्रियेतून काही तरी आउटपूट निघते. त्याच हेतूने मी लेखन प्रपंच केला होता. 
असो, अनेकांनी रिपाई नेतेच बदमाश.. तेच दोषी.. रिपाईमध्ये अन्य जाती जमातींना सामावून घेले जात नाही.. महारांचा पक्ष केला..वैगेरे वैगेरे .. अशा विविध प्रतिक्रिया दिल्या. 
मित्रांनो... आपण बाबासाहेबांचा जीवन संघर्ष बारकाईने वाचा. ज्या बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत इथल्या महारेत्तर मांग, चांभार, ढोर, बंजारा, वंजारा, माळी, साळी, तेली, कुणबी, अशा बहुजन शोषित-वंचीतांनी  नाकारले. त्यामुळे बाबासाहेबांना स्वतंत्र मजूर पक्ष, शेडूल्काष्ट फेडरेशन हे पक्ष गुंडाळावे लागले. त्यांनी मग रिपाईची संकल्पना आखली.
ज्या शोषित-वंचीतांसाठी बाबासाहेबांनी आयुष्य खर्ची घातले...  तरीही बाबासाहेबांनी मानव मुक्तीसाठी धर्मांतराची भूमिका घेतली म्हणून शोषित-वंचीतांनी बाबासाहेबांची राजकीय चळवळीत नाकारली. तरीही आपण म्हणता की आजच्या नेत्यांनी बहुजनांना include केले नाही. 
तर मित्रहो...माझ्या पुढील प्रश्नांची सद्सदविवेकबुद्धीला स्मरून उत्तरे ध्या...... अपोआप मग तुमच्या आरोपांचे खंडन होईल...
 नं -1) आजही  बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून महार आजचा बौद्ध सोडला तर अन्य कोणता समाज रिपाईला आपला पक्ष मानतो..? 
नं -2) आजही  महार आजचा बौद्ध सोडला तर अन्य कोणता समाज रिपाईच्या उमेदवारांना मतदान करतो.
नं -3) रिपाईमध्ये सारा शोषित-वंचित, मागास, बहुजन, कष्टकरी, अल्पसंख्याक समाज सामावून घेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत का ?
नं -4) बाबासाहेबांनी फक्त पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध यांच्यासाठी कार्य केलेले आहे का ?
नं -5) बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील महिलांच्या अधिकारासाठी संसदेत हिंदुकोड बिलासाठी आग्रह धरला. तेव्हा ते बिल हिंदू खासदार आणि तत्कालीन कॉंग्रेस सरकारने उधळून लावले. त्यामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते संसदेबाहेर निघून गेले... हा त्याग किती हिंदू महिला जाणतात. आज किती हिंदू महिला बाबासाहेबांना साधे वंदन तरी करतात ? 
नं -6) मंडल आयोगाचा लढा कोणी लढला ?
नं -7)  मंडल आयोगाचा लढा रिपाई नेत्यांनी अन कार्यकर्त्यांनी प्राणपणाने लढला. अनेक आंबेडकरी कार्यकर्ते त्या लढ्यात शहीद झाले, हे ठाऊक आहे का?
नं -7) पदरात लाभ पडल्यानंतर आता मंडल आयोगाचे गोडवे गाणा-या बहुजानांनीच (ओबिसिंनीच) तेव्हा सुरुवातीला मंडलला विरोध केला होता. हे आपणास ज्ञात आहे का?
बोलणे... कोणाला शिव्या देणे.. कोणाला कमी लेखणे फार सोपे असते...   
असो, 
या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ जातिवाद.. महारांच्या प्रगतीप्रती मनात असलेली खदखद ..  द्वेष... यामुळे घडताहेत मित्रांनो.   
आजही महाराष्ट्रात आरक्षित जागा मग त्या राजकीय पटलावर निवडणुकांच्या असो की नोकरीच्या.. त्यासाठी प्रस्थापितांना  महार वगळून सारे चालतात..... अस्पृश्यता दृश्य स्वरुपात नाही ती अदृश्य स्वरुपात तीव्रतेने जाणवते... सामाजिक, राजकीय, आर्थिक, प्रशासकीय एवढेच काय तर प्रसार माध्यमामध्ये सुद्धा  अस्पृश्यतेची दाहकता सहन करण्या पलीकडची आहे. 
तूर्तास एवढे पुरे........  

१३ डिसेंबर २०११

रिपब्लिकन पक्षाची वाताहत: दोषी कोण ?


रिपब्लिकन पक्ष... खरंच नावात दम आहे.पण दुर्दैव आज हा पक्ष विकलांग झाला आहे.
यात नवे ते काय? असा प्रश्न उपस्थित होईल. पण; जरा धीर धरा... मुद्दाम हा विषय चर्चेला आणलाय. नव्या पिढीलाही कळाले पाहिजे... बरीच अतिउस्ताही मंडळी उठसुठ रिपाईला टार्गेट करणारे लेखन करीत आहेत, त्यांनीही थोडे अंतर्मुख व्हावे. याचबरोबर विविध प्रसार माध्यमेही जाणीवपूर्वक उलटसुलट विधाने करून समाज संभ्रमित करीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन हे लिहिण्याचे धाडस केले आहे... असो,

विश्व्रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचा हा पहिलाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. त्यापूर्वी त्यांनी १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. परंतु, जातीविरहित वर्ग निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नाही असे वाटले. नेमकी ही बाब मातंग, चर्मकार, ढोर, मेहतर, तमाम शोषित-वंचितांना खटकली. ते सारे स्वतंत्र मजूर पक्षापासून दूरच राहिले. परिणामी स्वतंत्र मजूर पक्षाला म्हणवे तसे पाठबळ मिळाला नाही त्यामुळे तो बरखास्त करून बाबासाहेबांना १९४२ साली ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाची स्थापना करावी लागली; पण या पक्षातही अनुसूचित जातीतील महार वगळता अन्य दलित जाती सहभागी झाल्या नाहीत. वस्तुत: अनुसूचित जातीतील सर्व जातींना सवलती मिळवून देण्यात, सा-या वंचीताना न्याय मिळवून देण्यात बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. तरीही १९४२ व १९५२ च्या निवडणुकीत ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ला जबर पराभव स्वीकारावा लागला. ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’कडे हिंदू समाज एकजातीय पक्ष म्हणून पाहत होता. पक्षाला उच्चभ्रूंची मते मिळत नव्हती. पुढे स्वतंत्र भारतात जातीय पक्षांची गरज नाही, हे राजकीय वास्तव बाबासाहेबांनी जाणले व त्यांनी ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

रिपब्लिकन पक्ष व्यापक व्हावा म्हणून आचार्य अत्रे व एस.एम. जोशी यांनी या पक्षात सामील व्हावे, अशी पत्रे बाबासाहेबांनी उभयताना लिहिली होती. डॉ. राम मनोहर लोहियांशीसुद्धा पत्रव्यवहार केला होता. भारतीय समाजाचे प्रश्न जातीच्या चौकटीत सोडविणे शक्य नाही, तर ते सोडविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन, वर्ग जाणिवा व धर्मनिरपेक्ष विचार हेच खर्‍या अर्थाने उपयुक्त ठरतील, असे त्यांचे मत होते. रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक डावा पुरोगामी पक्ष व्हावा आणि त्याने तमाम दलित, पीडित, शोषित वर्गाचे हित जोपासावे, अशी बाबासाहेबांची रिपब्लिकन संकल्पना होती. दुर्दैवाने बाबासाहेबांचे अकाली महापरीनिर्वान झाले.

आता मुळमुद्यावर येऊ... बाबासाहेबानंतर दादासाहेब गायकवाडापासून ते आजच्या रामदास आठवले, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा खांद्यावर घेतली... या देशात मागास प्रवार्गाने सत्तेची किंवा नेतृत्वाची स्वप्ने बघू नयेत, समाज एकसंघ राहू नये, अशी इथल्या सा-याच प्रस्थापित राजकीय पक्षांची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांनी सतत ''तोड-फोडीचे'' राजकारण केलेले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्वादी काँग्रेसला बाबासाहेबांचे अनुयायी संघटीत होणे पडवणारे नाही. बहुजन समाज संघटित झाला तर काँग्रेस, सेना-भाजपला पर्याय निर्माण होऊ शकतो, म्हणून ते रिपब्लिकन पक्षाला संघटीत होऊ देत नाहीत. दलित नेत्यांना सत्तेचे गाजर दाखविले की तेही रातोरात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सेना-भाजपचा जयजयकार करण्यात मश्गुल होतायेत... सध्या दुस-या फळीतल्या कार्यकर्त्यांनाही चंगळवादी राजकारणाची चटक लागलेली आहे. समाजही नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत काँग्रेसमागे फरफटतोय... अन्य मागास,वंचित समाज काहीही झाले तरी रिपाईला आपला पक्ष मानायला तयार नाही... एकंदरीत महाराष्ट्रात या पक्षाचे चित्र वाईट आहे.
मग, प्रश्न येतो कि युपी मध्ये बीएसपी सत्तेत येते कशी....? मला तरी वाटते मायावती ह्या फुले-शाहू-आंबेडकर-बुद्धांचा कितीही जयघोष करीत असल्या. पण त्यांनी धर्मांतर तर केले नाही ना...? या भूमिकेतूनच त्यांना तिथे सर्व जाती समूहाचे पाठबळ मिळत असावे.

तात्पर्य:- महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वाताहतीला एक नाही तर अनेक करणे आणि घटक जबाबदार आहेत.

१० नोव्हेंबर २०११

" निष्ठा "... रक्तातच असावी लागते !


खरं सांगू.... आम्ही विज्ञानवादी अर्थात बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर... तथागत बुद्धांचे अनुयायी असल्यामुळे ज्योतिष... शकून-अपशकून, कर्म कांडावर आमचा विश्वास नाही ; पण श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे).. निष्ठा आणि निती, या गोष्टींवर किमान मी तरी विश्वाश ठेवतो... तसे आचरणही करतो... असो. तुम्ही म्हणाल, मग आम्हाला काय त्याचे?... आहे.. त्याच्याशी तुमचाही संबंध आहे म्हणूनच तर लिहिण्याचा हा खटाटोप केलाय...

... तर सांगण्याचा मुद्दा असा आहे. (थोडे विषयांतर होईल, पण समजून घ्या.) तुम्ही ज्या समाजात जन्माला आले. ज्या संस्कृतीने तुमचे भले-बुरे सोचले.. ज्यांनी तुम्हाला किमान माणूस म्हणून ओळख दिली.. ज्यामुळे तुम्हाला माणसासारखे जगण्याचे बळ मिळाले.. त्याच्याशी आपण कितपत एकनिष्ठ आहोत? .. पशूपेक्षाही हीन जीने आमच्या वाट्याला होते... ज्या समाज व्यवस्थेने आम्हाला माणूसपण नाकारले.. जे ३६ कोटी देवही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारण्याची आज्ञा देण्यास मजबूर आणि लाचार होते... तेव्हा युगानुयुगे चालले हे अन्याय मोडीत काढण्यासाठी पृथ्वीतलावर एक मसीहा अवतरला. त्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर... त्याने प्रस्थापित समाजव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारले. (आम्हाला म्हणजे फक्त महारांना नव्हे तर तमाम मागासवर्गीयांना) माणूस म्हणून जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही हा मूलमंत्र दिला. शिका-संघटीत व्हा अन आपल्या हक्कासाठी संघर्ष करा.. हा मुल मंत्र दिला.. आम्ही (फक्त पुर्वाश्रामिंच्या महारांनी आत्ताच्या बौद्धांनी) तो शिरसावान्ध्य मानला... बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले.. हा समाज बाबासाहेबांना.. त्यांच्या विचारांना एकनिष्ठ राहिला... बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार शिकला-सवरला... कृती केली...

नतीजा काय ? या समाजाला त्यामाध्यमातून एक नवी दिशा.. नवी उर्जा... नवी उर्मी ... नवे तेज.. एक चैतन्य.. दृष्टी आणि आत्मभान आले... परिणाम काय...? या देशात थोडे बहुत का असेनात पण मोक्याच्या पदांवर पुर्वाश्रामिंचे महार आणि आताचे बौद्ध विराजमान झाले... ते कोणाच्या मेहरबानीने नाही तर बाबासाहेबांचे उपकार आणि स्वतःच्या बुद्धीच्या बळावरच.

वाईट या गोष्टीचे वाटते की आमचे लहान भाऊ मांग, चांभार,ढोर अर्थात sc -st - obc - vjnt - सर्वच मागास प्रवर्गातील समाजांनी एक तर बाबासाहेबांना खुल्या अंतकरणाने स्वीकारले नाही... त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली... त्यांनी जो सामाजोद्धाराचा मूलमंत्र दिला.. त्याची थट्टा करून हिंदू संस्कुतीचेच आम्ही वफादार आहोत, हे दर्शविण्याचा केविलवाणा आकांत केला ... आजही तोच प्रयत्न सुरु आहे... त्यामुळे हा समाज आज सर्वार्थाने पिछाडीवर राहिला...

इथे मूळ मुद्दा आला '' निष्ठा''............! बौधेत्तर समाज निष्ठावान राहिला नाही... मराठा-ब्राह्मणांचे मांडलिकत्व त्या समाजाने स्वीकारले... परिणाम~~~~~? पूर्वाश्रमीचे महार आत्ताचे बौद्ध सोडून अन्य सर्व मागासवर्गीय हे मागासवर्गीयच राहिले...पण आपला हा दोष आणि चूक आजही ते स्वीकारायला तयार नाहीत, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे... उलट ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपणास गुलाम म्हणून वागविले त्या प्रस्थापित समाजाला वफादार असल्याचे दर्शिवाण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या भावंडाशी (महारांशी /बौद्ध) बेवफाईच केलेली आहे. याची कित्येक उदाहरणे देता येतील. बौद्धेत्तर किती आणि कोणता दलित समाज हा मुळात रिपब्लिकन पक्ष आपला समजतो? (अलीकडे या पक्षाचे नेते चुकले असतील पण या पूर्वी ?)

सांगायचे हे आहे की, तमाम दलितांनी जर बाबासाहेब स्वीकारले असते... त्यांच्या विचारांचे आचरण केले असते तर आजचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते...  असो, सत्य हे नेहमीच कटू असते मित्रांनो... हे आपणास कदाचित पचणार नाही.. पण प्रयोग करून पहा ... परिणाम अत्यंत सकारात्मकच येईल...

'' आमच्या घरात मूल जन्माला येते तेव्हा... अगोदर त्याला सर्वप्रथम आई आणि
दुसरा -जयभीम- हा शब्द उच्चारण्यास शिकवला जातो'' हि आहे निष्ठा आणि श्रद्धा...''









०७ नोव्हेंबर २०११

विद्यापीठ गेटने ओलांडली चाळिशी !


                                                           नामांतरापुर्वीचे गेट                                 नामांतरानंतरचे गेट

वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात... वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दुर्लक्षित जीवन.. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे...
असो, मुद्दा असा आहे कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ........हे नाव समोर आले की समोर चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या.... परिवर्तनाच्या लढ्याचे...! एरव्ही विद्यापीठ म्हटले कि ज्ञान दानाची एक सर्वोच्च संस्था, अशी विध्यापिठाची सर्वसाधारण प्रतिमा समोर येते. या विध्यापिठाबद्दल मात्र तसे होत नाही. हे देखील ज्ञानदानाचे सर्वोच्च केंद्र आहे. मात्र अन्य विध्यापिठाच्या तुलनेत या विध्यापिठाची ओळख वेगळी आहे... इतिहास वेगळा आहे. 

आता आपणास प्रश्न पडला असेल कि ठीक आहे पण हे सारे सांगण्याचे आत्ता औचित्य काय ? हा खटाटोप कशासाठी ? तर मित्रहो, आहे औचित्य... काय आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हटले कि समोर येते ती विद्यापीठगेटची प्रतिमा. त्यामुळे जगातील ही एकमेव वास्तू असेल ज्यामुळे संपूर्ण विद्यापीठ तर ओळखले जाते. काल रविवारी ६ नोव्हेंबररोजी या गेटने वयाची चाळीशी ओलांडली आहे.मात्र दुर्दैव हे कि त्याची आठवण ना प्रशासनाला होती, ना समाजाला..! हे विद्यापीठगेट म्हणजे समतेच्या लढ्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हे विद्यापीठगेट म्हणजे सामाजिक परिवर्तन लढय़ाची प्रेरणा.. अर्थात विद्यापीठ नामांतराचे प्रेरणास्रोत म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याशिवाय आंबेडकरी समाजाचे एक श्रद्धास्थान म्हणूनही ती वास्तू ओळखली जाते. नामांतराचा लढा म्हणजे या गेटवरील पाटी बदलण्याचा लढा नव्हता. ती प्रतीकात्मकदृष्ट्या सामाजिक समतेची लढाई होती. यासाठी तब्बल १७ वर्षे संघर्ष करावा लागला. मराठवाडाच नव्हे तर विदर्भ, खान्देशात आंबेडकरी समाजातील अनेकांना शहीद व्हावे लागले. अनेक महिला विधवा झाल्या. अनेक मुले अनाथ झाली. अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली..! 

शेवटी १४ जानेवारी १९९४ रोजी राज्य सरकारने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला अन् या गेटवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' अशी अक्षरे झळकली.. तेव्हापासून हे गेट म्हणजे आंबेडकरी समाजाचे श्रद्धास्थान बनले. दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!

या गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत. 

१० ऑक्टोबर २०११

''महासत्ता कोणत्या गाढवीचं नाव...?''

भारत येत्या २०२० मध्ये जगाची महासत्ता होणारचं... असे कोणाच्या भाषणातील बोल ऐकले की हसायला येते.
कशाला म्हणतात महासत्ता...? महासत्ता कोणत्या गाढवीचं नाव आहे?

खरंच, महासत्ता हा शब्द मला सतत अस्वस्थ करतोय... हा देश जोपर्यंत युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वार्थाने आत्मसात करीत नाही तोपर्यंत महासत्तेचे स्वप्नंच कुणी पाहू नये... आणि ते शक्यही होणार नाही... ही भविष्यवाणी नव्हे qकवा कोणा जोशाने सांगायचे जोतीष्य नाही.. हे वास्तव आहे...

अष्टपैलू व्यक्तिमत्व, अपार राष्ट्राभिमान आणि अथांग विद्वत्तेच्या बळावर जगभरात लौकिकास पावलेला हा महामानव मात्र स्वत:च्या देशात उपेक्षितच राहिला... हे या देशाचे दुर्दैव...! इथल्या बुरसटलेल्या मनुवादी समाजव्यवस्थेने आणि या व्यवस्थेच्या मनुवादी ठेकेदारांनी बाबासाहेबांसारख्या अलौकिक व्यक्तीमत्वालाही जेव्हा सोडले नाही तेव्हा समाजातील आमआदमीची तर काय गत असेल, याची कल्पनाही करवत नाही. असो, बाबासाहेबांनी या देशातील शोषित, वंचित, उपेक्षित, कष्टकरी सर्वहारा वर्गाला शिक्षणाचा मुलमंत्र दिला... शिक्षणाशिवाय तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचे बळ येणार नाही... शिक्षण नसल्यामुळे तुम्हाला डोळे असूनही दृष्टी नाही... पाय असूनही तुम्ही लंगडे आहात... हात असूनही तुम्ही दुबळे आहात... म्हणून तुमच्या मुलांबाळांना अगोदर शिक्षण द्या.... मग, बघा तुमच्यात आत्मबळ येईल... स्वाभिमान जागृत होईल... हा विश्वास बाबासाहेबांनी दिला... पशुपक्षांपेक्षाही हीन जिने जगत असलेल्या समाजाने बाबासाहेबांचा हा उपदेश कृतीत उतरविला... पोटाला चिमटा घेऊन मुलं शिकवली... अन् खरोखर जादूची कांडी फिरावी तसा चमत्कार घडला... शिक्षणाने या समाजाला जगण्याची दृष्टी आली... समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची उर्मी मिळाली... आम्हीही माणसं आहोत... आम्हालाही माणसारखंच जगायचयं, असे आत्मभान आले... स्वाभिमान जागृत झाला अन् क्षणात गावकी, येसकरकी, रामोशाची कामे झुगारुन दिली... आज देशात मोक्याच्या पदांवर समाजातील अनेक विद्वान मंडळी केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे विराजमान झालेली दिसून येते.. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय।, शेती अशी सारीच क्षेत्रे या समाजाने आता कवेत घेतली आहेत...

मग, काय या दुर्बल घटकाचे आता सारेच प्रश्न मिटले? अस्पृश्यता संपुष्टात आली.. अन्याय-अत्याचार बंद झाले.. गावचे संरजामदार या समाजाला मानसन्मान द्यायला लागले... पक्तींत सोबत बसतायेत म्हणून काय ते रोटी-बेटी व्यवहारास राजी व्हायला लागले...आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून या समाजाच्या शिकल्या सवरल्या मुलांनी त्यांच्या मुलींसोबत लग्न केली. करतायेत.. मग, ते जावई qकवा नातेवाईक म्हणून स्वीकार करतायेत.......साèयांचे उत्तर एकच.......नाही.!!!

आजही समाजव्यवस्था तीच आहे. पूर्वीची आणि आताची सारखीच... तिच्यात तसूभरही फरक qकवा बदल झालेला नाही. केवळ मेकअप केल्याप्रमाणे अलिकडे तिचा चेहरा बदलला आहे... अस्पृश्यतेचे स्वरुप बदलले आहे... अदृश्यस्वरुपाची अस्पृश्यता आजही या समाजाचा जीवघेणा छळ करीत आहे... मग ती प्रशासकीय अस्पृश्यता असेल.. मग ती राजकीय अस्पृश्यता असेल qकवा आर्थिक अस्पृश्यता असेल. गावात आजही ताटात जेवण करणारे संरजामदार ज्याला प्रचलीत भाषेत सवर्ण म्हणातात... ते ओठात एक अन् पोटात एक, या प्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर या समाजाची सतत नाकेबंदी करीत आहेत... २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावरही देशात जर अशी विसंगती असेल तर महासत्तेच्या पोकळ गप्पा कशासाठी.?

दुसरीकडे, स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगता बाबासाहेबांनी सर्वसमावेशक अशी सुंदर लोकशाहीप्रधान राज्यघटना या देशाला अर्पण केली... काय झाले पुढे? सत्तेत बसलेल्या राजकारण्यांनी आजपर्यंत त्या राज्यघटनेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे दुबळा समाज अधिक दुबळाच राहिला.. त्याला ही समाजव्यवस्था खुलेआम दाबत राहिली... समाजाच्या उत्थानाच्या केवळ वल्गना करीत राहिले हे सत्ताधारी...

मग आता सांगा तुम्हीच हा देश कसा होईल महासत्ता..?

२५ सप्टेंबर २०११

घराणेशाहीचं चांगभलं...!


राजकारणामध्ये कष्टकरी, गरीब, दलित, पददलित, शोषित, वंचित, उपेक्षित, अल्पसंख्याक, सर्वसामान्य शेतकरी अर्थात प्रचलित राजकीय भाषेत सांगायचेच तर ‘आम आदमी'ला कवडीचेही स्थान राहिलेले नाही. ज्याला राजकारणाची खाज आहे. त्याने मग सत्ता अथवा महत्वाच्या पदावर जाण्याचे स्वप्न न बघता आयुष्यभर मॉडर्न पद्धतीची येस्करकी करावी अन् खुशाल त्यातच समाधान मानावे. सत्ता तर लांबची बात. आम आदमीला पक्ष-संघटनांच्या मुख्य बॉडीमध्ये सामावून न घेता अलिकडे त्यांच्यासाठी खास ‘अल्पसंख्याक सेल', ‘मागासवर्गीय सेल', अमका सेल, तमका सेल अशा दुय्यम आघाड्या उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ज्याचा निर्णय प्रक्रियेशी कवडीचाही संबंध कधी येत नाही. बिचारी लाचार मंडळीही अशाच सेलच्या माध्यमातून दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत......!

असो, महाराष्ट्राच्या राजकारणापुरते बोलायचे झाल्यास आजपर्यंत या राज्यातील सत्ता अवघ्या ४५ घराण्यांभोवतीच फिरते आहे. मंत्रीपदे, संघटनाची मुख्यपदेही याच घराण्यांच्या दावणीला बांधलेली.. अन् वर पुन्हा म्हणायचे ‘आम्हाला घराणेशाही मान्य नाही'... ही बाब एका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांचीच नाही तर शिवसेनेतही तेच चालू आहे. या पक्षांची चर्चा इथे यासाठी की, हे सारे सत्तेच्या परीघात सामावलेले आहेत म्हणून...

परवा युवक काँग्रेसची राज्यभरात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली... नतिजा काय? या निवडणुकीमध्ये राज्यातील एकूण एक जिल्ह्यात पुढा-यांची पोरं निवडून आली. एकिकडे राहुल गांधींच्या आदेशानं युवक काँग्रेसची निवडणूक लोकशाही पद्दतीनं पार पडली खरी पण निकालांवर नजर टाकली तर घराणेशाहीचं प्रस्थ कायमच राहिल्याचं दिसतंय.

२९ जानेवारी रोजी डहाणू येथे झालेल्या जाहीर सभेत अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हे आवाहन करतात की, राजकारणातील घराणेशाही आणि भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आदिवासी आणि दलित तरुणांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे. माझे आजोबा, आजी, वडिल आणि आई राजकारणात राहिले, ही घराणेशाहीच असून मला ती संपवायची आहे. त्यासाठी दलित आणि आदिवासी समाजातून समक्ष नेतृत्वाची मला आवश्यकता आहे. आणि आता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी केले काय तर आपलीच कार्टी निवडणुकीला उभी केली अन निवडूनही आणली...

राहुल गांधींच्या विचारला महाराष्ट्रातील नेत्यांनी हरताळ फासला.त्याचे हे मजेशीर किस्से... युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पतंगराव कदमांचे सुपुत्र विश्वजित कदम हे निवडून आलेत....!
विदर्भात यवतमाळ लोकसभा क्षेत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल तर नागपुरमध्ये दत्ता मेघेंचा मुलगा समीर, अकोला मतदार संघात माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा मुलगा नकुल देशमुख हे निवडून आले. परभणीत आमदार रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी मेघना निवडून आलीय. रेंगे पाटलांचे चिरंजीव बाळासाहेब, नांदेडमध्ये ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा पिंकू, जालन्यात सत्संग मुंडे हा आमदारांचा पुत्र निवडून आलाय. थोडाफार अपवाद सोडला तर राज्य भारत हेच चित्र आपणास पाहायला मिळेल.

राष्ट्रवादीचे काय? ते हि असेच. शरद पवार साहेबांचे हट्टी पुतणे अजितराव उपमुख्यमंत्री. लाडकी कन्या सुप्रिया सुळे खासदार...

भाजपचे....? मुंडे साहेबांचे पुतणे धनंजय, आमदार... लेक पंकजा, आमदार... जावयाला डावलले म्हणून बिचारा गेला आता राष्ट्रवादीत...!

मग शिवसेना तरी मागे का......

“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!” हे उदगार आहेत, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे गेल्या वर्षाच्या शिवतीर्थावरील दशहरा मेळाव्यातले. उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष मी नव्हे त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. ok....


विशेष म्हणजे, त्याच मेळाव्यात दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर युवराज आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग करण्यात आले. ज्याला संघर्ष कशाला म्हणतात ते माहिती नाही ... महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव नाही, अभ्यास नाही..आंदोलनाची धग काय ती माहिती नाही. महाराष्ट्राचा शेंडा बुडका माहिती नाही, अशा कोवळ्या पोराला काय तर म्हणे युवा सेनेचे अध्यक्ष. सेनेत ज्यांनी तारुण्य पणाला लावले, त्यांना काय मिळाले....? त्यांनी
असो, आता सरळसरळ युवराजांची झील ओढायची. त्यांचा जय हो.. करायचा.

त्पर्य, हे सारेच पक्ष म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर 'चोर चोर मौ सेरे भाई' ....!

सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी मग ते कोणत्याही पक्षात असोत त्यांनी सतरंज्या उचलण्यासाठी अन साहेबांच्या आगे बढोच्या घोषणा देण्यासाठी आयुष्य घालवावे. आपापल्या जात समूहाचे मतदान यांच्या पारड्यात टाकण्यासाठी रक्त आटवायचे.......... बस्स......!

११ सप्टेंबर २०११

ध्येयापासून तसूभरही विचलीत न होणारे बाबासाहेब.. अन् तेवढेच हळवे



रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर...!!!

रमा..., कशी आहेस तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.

दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.

मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.

रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.

आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.

मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा ! मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.

खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.

माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.

रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.

रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.

सर्वांस कुशल सांग.

कळावे, 
तुझा

भीमराव
लंडन
३० डिसेंबर १९३०

(यशवंत मनोहर यांच्या 'रमाई' या पुस्तकातून साभार)

०४ सप्टेंबर २०११

ढेकुण मारून शहीद होणे...हि मर्दुमकी नव्हे !!!


मागील १०-१५ दिवसापासून दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या '' लीला '' सर्वांनीच पहिल्या.. आपल्यापैकी काहींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचे समर्थनही केले. मिडीयानेही त्या '' लीला '' क्याच नव्हे क्याश केल्या. आण्णा आणि टीम च्या आंदोलनाचा धुराला उडाला. राज्य घटना.. लोकशाही... संसदेला जेवढे वेठीस धरता येईल तेवढे आण्णा आणि व त्यांच्या सवंगड्यांनी धरले.... असो, अंधपणे पाठींबा देणे हा माझा स्वभाव नाही अन ते आमच्या स्वभावाला पटतही नाही. एक पत्रकार म्हणून प्रवाहाच्या विरोधात जाउन सत्यता पडताळून पाहणे कधीही चंगले. सांगण्याचा मुद्दा असा की, लोकपाल... भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचे प्रभावी हत्यार, असा समज आण्णा व त्यांच्या समर्थकांचा आहे. हरकत नाही. भ्रष्टाचाराचा थेट फटका सामान्य माणसालाच बसतो. त्यामुळे भ्रष्टाचारचे समर्थन कोणीही करणार नाही. पण, आणांच्या लोकपाल संकल्पनेत NGO' s,नाहीत. जे योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचा मलिदा लाटतात. लोकपाल च्या कक्षेतून खाजगी एन जी ओ ना वगळण्याचे कारण काय ? कि अण्णा हजारेंपासून केजरीवाल, बेदी, स्वामी अग्निवेश यांच्या एन जी ओ आहेत आणि त्यांना करोडो रुपये अनुदान आणि मदत मिळत असते म्हणून ? लोकपाल कक्षेत सरकारी अधिकारी-कर्मचारी नाहीत...(आता बोंब झाल्यावर आण्णांना हे सुचले) गावच्या ग्रामसेवकापासून ते मंत्रालयातील साचीवान्पार्यंत सामान्य मानसंची अडवणूक होते. प्रश्न काळ्या पैश्याचा ? मध्यंतरी स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेविबद्दल या मंडळींनी बरीच ओरड केली... ते समर्थनीय होते. पण, आण्णा आणि मंडळींनी भारतातील धार्मिक भ्रष्टाचार किंवा तेथे श्रद्धेच्या आडून केल्या जाणाऱ्यागोरख धंद्याबद्दल मात्र चुप्पी का बरे साधली असावी ? अण्णा धार्मिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दलही जरा बोला. भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार धार्मिक क्षेत्रात होतोय. भारतात बाबा, बापू, भैयू, साध्वी, महाराज यांच्याकडे लाखो-करोडो रुपयाची मालमत्ता आहे. पण त्याबद्दल अण्णा किंवा त्यांचे सहकारी अवाक्षरही काढत नाहीत. नुकतेच केरळ मधील पद्मनाभ मंदिरात एक लाख कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. ती संपत्ती निर्विवादपणे राष्ट्राची असताना काही महाभाग मंदिर व्यवस्थापनाचा अधिकार प्रस्थापित करू पाहत आहेत. आज अनेक बाबा लोक अण्णांच्या आंदोलनात अग्रभागी आहेत. त्यांचीही संपत्ती जाहीर झाली पाहिजे. एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आण्णा आणि मंडळींनी त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. प्रती गांधी बनून लोकांच्या भावनेशी जास्त काळ खेळणे अंगलट येऊ शकते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली या देशाची घटना आणि लोकशाही साऱ्या जगात आदर्शवत ठरली आहे. पण, आण्णा व त्यांच्या बगलबच्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य घटनेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली घटना बदलण्याचे आणि घटनेबद्दल अपप्रचार करण्याचे षडयंत्र तर राबवत नाहीत ना अशी शंका यायला लागली आहे. न्या. बी. जी. कोळसे-पाटील म्हणतात, ''देशाचा कारभार हा भारतीय घटने प्रमाणे चालतो. तीच सर्वश्रेष्ट आहे . घटनेनुसार कायदे करायचे अधिकार फक्त पार्लमेंटला व विधानसभेला आहेत. सिविल सोसायटीला कसा कायदा असावा किंवा कायद्यात काय दुरुस्त्या असाव्यात एवढाच सांगण्याचा अधिकार आहे. मी म्हणतो तो कायदा पास करा असे दडपण, उपोषणाच्या माध्यमातून कितीही मोठ्या माणसाला आणता येत नाही. अण्णांनी त्यांचे लोकपाल बिल पार्लमेंटला दिले आहे येथेच आणांचे काम संपले आहे. त्यामुळे अण्णांनी यापुढे सतत उपोषण करून दबाव न आणणे यातच खरे हित आहे. एक ध्यानात घ्या...... ''आण्णा तुम्ही महान आहात... पण घटनेपेक्षा लहान आहात''तूर्तास एवढेच...........